electricity

निसर्ग वादळ आणि श्रीवर्धन:

३ जूनला निसर्ग वादळ जे आलेलं ते ना आमच्या वडिलांनी उभ्या आयुष्यात बघितलेलं ना आजोबांनी. निसर्गाचा प्रकोप इतका भयानक पाहायला मिळाला कि आज १७ ते १८ दिवस होत आले तरी ना वीज पोहोचली ना कसली योग्य मदत. २१व्या शतकात असूनही स्वातंत्र्यपूर्व काळात असल्याचा आता भास होत आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये आधीच आर्थिक कंबरडे मोडूनसुद्धा कोंकणी माणसाने नेहमीप्रमाणे पावसाळ्यापूर्वीची कामे लागबगीने पूर्ण केली होती. पण कोणाला इतक्या गंभीर संकटाला सामोरे जात येईल याची किंचितही कल्पना नव्हती. ११०-१२० प्रती तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी नुकतीच पूर्ण केलेल्या घरांची छप्पर, पत्रे व कौले मोडकळीस आणली. चिंब पावसात रात्री-रात्री काढाव्या लागत आहेत. ना जेवणाची सोया ना चूल राहिली. गेली अठरा दिवस नेत्यांचे दौरे, आश्वासने आणि सोशल मीडियावरील सांत्वनाशिवाय हाती कसलीच योग्य मदत मिळाली नाही.

याउलट व्यापाऱ्यांचा काळाबाजार उदयास आला आणि अक्षरशः कोकणी माणसाला स्वतःचे दागिने विकून/ गहाण ठेवून छप्पराची सोय करावी लागतेय. लोकप्रतिनिधी आम्ही कशाला निवडून देतो आणि संकटकाळात पदरी काय पडत याचा हिशोब निवडणुकीवेळी दाखवणं आता काळाची गरज बनलीय आणि हि वेळ राजकारण्यांनीच आणली आहे. दुप्पट भावात पत्रे, कौले, लागणारे स्क्रू/ नट आणि हुक व्यापाऱ्यांकडून विकले जात आहेत, त्याबद्दल जनतेचे कैवारी अवाक्षरही काढत नाहीत.

विजेचे खांब आणि electricity transformers मोडून पडलेले आहेत. जर शासनाने विविध भागातून मनुष्यबळ मागवले आहेत तर मग अजून ३ आठवडे होत आले तरी श्रीवर्धन शहरात वीज आली नाही ग्रामीण भाग तर अजून दूरच. आधीच कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प होता आणि या परिस्थितीत अत्यावश्यक सेवासुद्धा कोलमडलेली आहे. इतर तालुक्यातून दुप्पट ते तिप्पट भावात जनरेटर भाड्याने आणावे लागत आहेत. संपर्कात राहण्यासाठी प्रती मोबाईल चार्जिंगसाठी जवळपास ५० रुपये मोजावे लागत आहेत.

घर, शेती, दुकान यांचे नुकसान झाले आहेच परंतु कष्टाने घेतलेलया वाहनांचेसुद्धा बरेच नुकसान सहन करावे लागत आहे. १९७८ पासून श्रीवर्धन मतदार संघातून जावळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आलेले आहेत परंतु तरीही हा भाग सुखसोयींसाठी आणि उपाययोजनांसाठी अजूनही मागासच ठेवला आहे हे जाणवत आहे.

शेतीची कामे रेंगाळलीत, कोंकण हा फळउत्पादनासाठी ओळखला जातो परंतु वादळात आंबा, नारळ, सुपारी, काजू, फणस यांसारखी झाडे मोडून पडलीत त्यामुळे पुन्हा झाडे वाढून उत्पादन मिळण्यासाठी साधारण ७-८ वर्षाचा कालावधी लागतो. तरीसुद्धा कोंकणी माणूस खंबीर उभा आहे. परंतु भोळेपणाचा कितपत फायदा घ्यायचा किंवा रायगडमध्ये वादळामुळे काही जास्त घडलेच नाही असा विचार जर सरकार करत असेल तर मग कोंकणी माणसाला आता आतून आणि बाहेरून पण काटेरी बनाव लागेल.

अजूनही लोक संयमी आहेत असं समजून जरी चाललो असलो तरी चाललेल्या मदतीचा वेग पाहता संयम लवकरच तुटेल अशी जनभावना होत चालली आहे आणि तसही सर्वत्र वीज आल्यावरती मोबाईलद्वारे अधिक दाहकता समोर येईलच.